श्री दत्त जयंती पौराणिक कथा

      प्रभु दत्तात्रयांच्या जन्माविषयी अनेक पौराणिक कथा आहेत. 'अवधूत' हे दत्तात्रेयांचे नाव असून या शब्दाचा अर्थ म्हणजे, नेहमी आनंदात रमणारा. मात्र सर्व कथांमधून प्रभु दत्त हे अत्रीऋषी व अनुसया मातेंचे पुत्र आहेत हे समजते. प्रभु दत्त हे त्रिदेवांचे अवतार म्हणजेच ब्रह्मा, विष्णु व महेश (शिव) या तीनही देवांचे अवतार आहेत. योगसाधनेत प्रभु दत्तात्रेयांना 'गुरु' मानले जाते. प्रभु दत्तात्रेयांनी २४ गुरु केले. प्रभु दत्तात्रेयांच्या पाठीमागे असलेली गाय  म्हणजे पृथ्वी व प्रभुंच्या आसपास असलेले चार श्वान म्हणजे, चार वेदांचे प्रतीक आहे.
    प्रभु दत्तांच्या खांद्याला एक झोळी असते याचा भावार्थ असा आहे, श्रीदत्त दारोदारी फिरून झोळीत भिक्षा जमावतात. घरोघरी फिरून भिक्षा मागितल्याने, 'अहं' कमी होतो; म्हणून झोळी ही अहं नष्ट झाल्याचे प्रतीक आहे. श्रीदत्तांच्या हातात आपणांस 'कमंडलू' दिसते. कमंडलू हे संन्याशाच्या सोबत आढळते. संन्यासी हा विरक्त असतो अशात कमंडलू हे एकप्रकारे त्यागाचे प्रतीक दर्शवते. श्रीदत्तांकडे ब्रह्मदेवांचे कमंडलू व जपमाळ, श्रीविष्णूंचे सुदर्शन चक्र व शंख आणि महेशांचे अर्थात शिवांचे त्रिशूळ व डमरू आढळते.
    प्रभु दत्तांचे पहिले अवतार म्हणजे, 'श्रीपाद श्रीवल्लभ'. द्वितीय अवतार म्हणजे, 'श्री नृसिंह सरस्वती' होय तर तृतीय अवतार 'स्वामी समर्थ' असल्याचे समजते. नरसोबाची वाडी, औदुंबर, गाणगापूर अशा प्रसिद्ध श्रीदत्तक्षेत्री आपणांस पादुकांची स्थापना केलेली आढळते. प्रभु दत्त हे त्रिमुखी आहेत. याशिवाय आपणांस प्रभु दत्त हे एकमुखी देखील पाहायला मिळतात.
    अनुसया मातेंनी त्रिदेवांना पुत्ररूपात प्राप्त करण्यासाठी घोर तपस्या केली. त्यांच्या तप सामर्थ्याने त्रिभुवन पोळून निघाले. अनुसया मातेंच्या घोर तपावर प्रसन्न होऊन त्यांच्या समोर त्रिदेव प्रकट झाले व त्यांना वरदान मागायला सांगितले तेव्हा,  अनुसया मातेंनी 'तुम्ही त्रिदेव पुत्ररूपात माझ्या पोटी जन्म घ्यावा' असे वरदान मागितले. तिन्ही देव प्रसन्न होऊन तथास्तु म्हणाले. त्रिदेवांच्या आशीर्वादाने माता अनुसयांच्या पोटी दत्तात्रेयांचा जन्म झाला. 
    श्रीदत्त जयंतीला प्रभु दत्तात्रेयांचा जन्म झाला. हिंदू धर्मात मोठया संख्येने दत्तभक्त हे दत्तजयंतीच्या दिवशी व्रत करतात. ह्या दिवशी दत्तभक्त श्रीगुरुचरित्राचे पारायण करताना दिसतात. श्रीदत्तात्रेयांच्या 'दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा' नामाचा जप करतात. प्रभु दत्तांचे विधीनुसार पुजन करून नैवेद्य अर्पण करतात. प्रभु दत्तांचे वास्तव्य असलेल्या औदुंबर वृक्षाची पुजा करतात व पाणी, नैवेद्य अर्पण करतात. तसेच गरिबांना फळे अथवा भोजन दान करतात.
             Thanks for visiting the blog

Comments

Popular posts from this blog

माझा छंद निबंध मराठी

अक्षयतृतीया पौराणिक महत्व मराठी

नवरात्रीचे नैवेद्य मराठी