वटपौर्णिमा मराठी कथा
फार पूर्वी भद्र देशात अश्वपती नावाचा राजा होता. त्याला सावित्री नावाची एक अतिशय सुंदर, नम्र व गुणी मुलगी होती. पुढे सावित्री उपवर झाल्याने राजाने तिलाच आपला पती निवडण्याची संधी दिली. सावित्रीने सत्यवान नावाच्या एका राजकुमाराची निवड केली. सत्यवान हा शाल्व राज्याच्या ध्रूमत्सेन नावाच्या अंध राजाचा पुत्र होता. तो राजा शत्रुकडून हरल्याने आपल्या राणी (पत्नी) व पुत्रासह जंगलात राहत होता. सत्यवान हा शूर व गुणी होता; पण तो अल्पायुषी होता.
भगवान नारदांना सत्यवान अल्पायुषी होता हे माहित होते म्हणून, सावित्रीने सत्यवानाशी विवाह करू नये असे त्यांना वाटत होते. नारदांनी सावित्रीला तिचा होणारा पती (सत्यवान) हा अल्पायुषी आहे हे सावित्रीला सांगितले व, तु सत्यवानाशी विवाह करू नकोस असा सल्ला दिला परंतु, सावित्रीचे सत्यवानावर प्रेम असल्याने तीने सत्यवानाशी विवाह केला.
विवाहानंतर सावित्री आपल्या पती सत्यवान समवेत व सासू- सासऱ्यांसोबत जंगलात राहू लागली. सत्यवानाचा मृत्यू जेव्हा तीन दिवसांवर येऊन ठेपला, तेव्हा सावित्रीने तीन दिवस कठोर व्रत उपवास केला. तीन दिवसांनंतर जेव्हा सत्यवान जंगलात लाकडे तोडण्यास निघाला असता सावित्रीही त्याच्यासोबत निघाली. अचानक लाकडे तोडता- तोडता त्याला चक्कर आली व तो जमिनीवर पडला.
यमराज तेथे आले व सत्यवानाचे प्राण नेत असताना सावित्रीही यमराजांचे वाहन असलेल्या रेड्याच्या शेपटीला धरून यमराजांच्या मागे आपल्या पतीचे प्राण आणण्यासाठी गेली. यमराजास हे कळले असता त्यांनी सावित्रीला परत जाण्यास सांगितले परंतु, माझ्या पतीचे प्राण वापस घेतल्याशिवाय मी जाणार नाही असे सावित्रीने यमराजास सांगितले.
सावित्री यमराजाबरोबर जात असताना तीने वाटेत पतीनिष्ठा आणी पतीव्रतेची कर्तव्ये यांचे विद्वत्तापूर्ण असे विवेचन केले तेव्हा, यमराजाने तिला तीन वर (इच्छा) मागण्यास सांगितले; पण पतीचे प्राण परत न मागण्याची अट घातली. सावित्रीने पहिला वर मागून सासू- सासऱ्याचे डोळे परत मागून घेतले. दुसरा वर मागून सासू- सासऱ्यांचे राज्य परत मिळवून घेतले. तिसरा वर मागण्यापूर्वी सावित्री यमराजास म्हणाली, "तुम्ही साक्षात सूर्याचे पुत्र! स्वधर्माने तुम्ही राज्य चालवता म्हणून, तुम्ही धर्मराज म्हणूनही ओळखता". यावर यमराज म्हणाले, "सावित्री तु तुझा तिसरा वर माग व येथून मागे जा".
यावर सावित्रीने तिसरा वर मागितला. " यमराज, मला पुत्र व्हावा!" यावर यमराज म्हणाले, "तथास्तु!" सावित्रीची पतीनिष्ठा पाहून यमराज देखील आश्चर्यचकीत झाले. आपल्या निर्णयावरून कधीही मागे न हटणारे यमराज त्यादिवशी सावित्रीच्या पतीनिष्ठेपुढे झुकले व सत्यवानाचे प्राण परत केले. अशा प्रकारे सावित्रीने आपल्या पतीनिष्ठेच्या बळावर आपल्या पतीचे प्राण परत आणल्याने यादिवशी विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्याची प्रार्थना देवाकडे करतात व उपवास करतात.
Thanks for visiting the blog
Comments
Post a Comment