श्रावण सोमवार व्रत कथा मराठी
∆ कथा श्रावणी सोमवार ची :-
एका नगरात एक श्रीमंत व्यापारी राहत होता. त्याच्याकडे धन- दौलत, मान- सन्मान सर्व काही होते परंतु त्याला संतान नसल्याने तो नेहमी दुःखी राहायचा.
त्याला नेहमी चिंता वाटायची की, आपला व्यापार, संपत्ती पुढे जाऊन कोण सांभाळणार? म्हणून त्याने पुत्रप्राप्तीची इच्छा पूर्ण व्हावी यासाठी प्रत्येक सोमवारी भगवान शंकरांचे व्रत आणी पूजा करत असे. तसेच सायंकाळी शिवमंदिरात जाऊन शिवजीं समोर तुपाचा दिवा लावत असे.
त्या व्यापाऱ्याची भक्ती पाहून माँ पार्वती भगवान शिवांना म्हणतात की, 'स्वामी हा व्यापारी तुमचा भक्त आहे. अनेक वर्ष याने सोमवार व्रत व पूजा नियमितपणे केली आहे. तुम्ही यांची मनोकामना पूर्ण करायला हवी.'
तेव्हा भगवान शिव माँ पार्वतींकडे बघून मंद हास्य करत उत्तर देतात की, 'हे पार्वती, या संसारात प्रत्येक व्यक्तीला त्याच्या कर्माप्रमाणे फळ मिळते.' पण माँ पार्वतींनी हट्ट धरला की तुम्ही त्या व्यापाऱ्याला पुत्रप्राप्तीचे वरदान द्यावे. माँ पार्वतींच्या आग्रहावरून भगवान शिव त्या व्यापाऱ्याला पुत्रप्राप्तीचा आशीर्वाद देतात व रात्री त्या व्यापाऱ्याला स्वप्नात दर्शन देऊन सांगतात की, मी तुझ्या भक्तीवर प्रसन्न होऊन तुला पुत्रप्राप्तीचे वरदान दिले आहे परंतु तुझा पुत्र केवळ सोळा वर्षच जीवन जगेल. देवाच्या वरदानामुळे तो व्यापारी खूप खुश होतो पण एकीकडे आपल्या पुत्राच्या अल्प आयुष्याची चिंता त्याला सतावू लागते.
तो पूर्वीप्रमाणेच सोमवार चे विधिवत व्रत आणी पूजन करत राहतो. काही दिवसांनी त्याच्या घरी एका सुंदर पुत्राचा जन्म होतो. त्याचे नाव अमर ठेवण्यात येते.जेव्हा अमर बारा वर्षांचा होतो तेव्हा त्याला विद्याभ्यासासाठी वाराणसीला पाठवण्याचा निश्चय होतो.त्यासाठी अमरचे मामा दीपचंद यांना बोलावण्यात येते.अमर आणी दीपचंद वाराणसीला जाण्यासाठी निघतात.
वाटेत जेथे ते विश्राम करण्यासाठी थांबतील तेथे अमर यज्ञ करत असे, ब्राह्मणांना भोजन देत असे. असे करत करत ते एका नगरात जातात. त्या नगरातील राजकन्याचा विवाह होणार असतो. ठरल्याप्रमाणे वरात आलेली असते मात्र, वर पित्याला एक चिंता सतावत असते ती चिंता म्हणजे, वरमुलाचा एक डोळा काना असतो.
जर हे सत्य राजाला समजले तर तो विवाहाला नकार देईल.या चिंतेत असतानाच मुलाच्या पित्याची नजर अमरवर पडते आणी त्याला एक कल्पना सुचते की, जर नवऱ्या मुलाच्या जागी अमरला उभे केले तर लग्न होऊन जाईल आणी लग्नानंतर अमरला भरपूर धन देऊन राजकुमारीला आपल्या घरी घेऊन जावे.
ही गोष्ट त्याने अमर आणी दीपचंद यांना बोलून दाखवले.धनाच्या लालसेने दीपचंद ने देखील होकार दिला आणी अमर चा विवाह राजकुमारी चंद्रिका सोबत पार पडतो.मात्र, तेथून निघताना अमरला राजकुमारीशी खोटे बोलणे योग्य वाटले नाही आणी त्याने राजकुमारीच्या ओढणीवर लिहिले की, राजकुमारी चंद्रिका तुझा विवाह तर माझ्याशी झाला आहे पण मी विद्याभ्यासासाठी वाराणसीला जात आहे.
तु ज्या युवकाची पत्नी होणार आहेस तो डोळ्याने काना आहे. राजकुमारीला हे सर्व समजते तेव्हा ती त्या मुलासोबत जायला नकार देते आणी हे सर्व सत्य राजाला समजते तेव्हा राजा आपल्या राजकुमारीला राजवाड्यात ठेऊन घेतो. अमर आपला मामा दीपचंद सोबत वाराणसीला पोहोचतो आणी गुरुकुलमध्ये विद्याभ्यास सुरु करतो. बघता बघता अमरला सोळा वर्षे पूर्ण होतात. सोळा वर्षे पूर्ण होताच अमर एक यज्ञाचे आयोजन करतो. यज्ञ समाप्त होताच तो ब्राह्मणांना भोजन व अन्न, वस्त्र यांचे मोठ्या प्रमाणात दान करतो.
सर्व कार्यक्रम पार पडल्यानंतर अमर आपल्या शयनकक्षात आराम करण्यासाठी जातो आणी भगवान शंकरांच्या आशीर्वादानुसार अमर ची प्राणज्योत शयन अवस्थेतच मावळते. सूर्योदय होताच जेव्हा दीपचंद अमरला मृतावस्थेत पाहतो त्याला त्याला खूप दुःख होते आणी तो जोरजोराने रडू लागतो.
दीपचंदचा रडण्याचा आवज ऐकून जवळून जाणाऱ्या शिवपार्वतीच्या कानावर पडतो आणी पार्वती माँ भगवान शिवांना विनंती करते की, हे प्राणनाथ मला हे रडण्याचे स्वर सहन होत नाही आहेत. तुम्ही या व्यक्तीचे कष्ट दूर करा.
तेव्हा शिवजी मातेला सांगतात की, हा मृत मुलगा त्याच व्यापाऱ्याचा पुत्र आहे ज्याला मी सोळा वर्ष आयुचे वरदान दिले होते. तेव्हा पार्वती माँ पुन्हा भगवान शिवांना विनंती करतात की, तुम्ही या मुलाला जिवंत करा. नाहीतर पुत्राच्या मृत्युमुळे त्याचे माता- पिता देखील स्वतः च्या प्राणांचा त्याग करतील. पार्वती मातेंच्या विनंतीवरून, भगवान शिव त्या मुलाला पुन: जीवित करतात. काही क्षणांतच तो मुलगा जिवंत होतो. विद्याभ्यास पूर्ण करुन अमर त्याच्या मामा सोबत आपल्या नगराकडे जायला निघतो.
जाता जाता ते दोघं त्या नगरात थांबतात जेथे अमरचा विवाह झालेला असतो. नेहमीप्रमाणे त्या नगरात ही अमर यज्ञाचे आयोजन करतो.तेथून प्रवास करत असताना राजा त्या यज्ञाचे आयोजन पाहतो आणी त्याच क्षणी राजा अमर ला ओळखतो व त्या दोघांना आपल्या राजवाड्यात घेऊन जातो.
काही दिवस आपल्या राजवाड्यात ठेऊन त्यांना वस्त्रे आणी काही सैनिक देऊन राजा आपल्या राजकुमारीला विदा करतात.इकडे व्यापाऱ्याने व त्याच्या पत्नीने स्वतः ला एका खोलीत बंद करुन घेतले असते आणी अन्नपाण्याचा त्याग करून ते आपल्या मुलाची प्रतीक्षा करत असतात.
जेव्हा व्यापारी आणी त्याची पत्नी आपल्या मुलाला व सुनेला पाहतात तेव्हा ते खूप आनंदित होतात. त्या रात्री भगवान शंकर त्या व्यापाऱ्याला स्वप्नात दर्शन देऊन सांगतात की, मी तुझ्या सोमवार च्या व्रत आणी पूजेच्या भक्तीभावाने प्रसन्न होउन तुझ्या मुलाला मी दीर्घायुष्य प्रदान केले आहे.
ओम नमः शिवाय
हर हर महादेव
जर तुम्हांला एखाद्या व्रताची माहिती हवी असल्यास मला comment box मध्ये कळवा.
Thanks for visiting the blog
Comments
Post a Comment