कथा हरितालिकेची मराठी
एके दिवशी शंकर पार्वती कैलासपर्वतावर बसले होते. पार्वतीनं शंकरांना विचारलं की, स्वामी सर्व व्रतात चांगलं असं व्रत कोणतं? आणी कोणत्या पुण्याईनं मी आपल्या पदरी पडले हेही मला सांगा.
तेव्हा शंकर म्हणाले, जसं नक्षत्रात चंद्र श्रेष्ठ, ग्रहात सूर्य श्रेष्ठ, चार वर्णांमध्ये ब्राह्मण श्रेष्ठ, नंद्यामध्ये गंगा श्रेष्ठ, त्याप्रमाणे हरितालिका हे व्रत सर्वांमध्ये श्रेष्ठ आहे. ते तुला सांगतो. तेच तु पूर्वजन्मी हिमालय पर्वतावर केलंस आणी त्याच पुण्यानं तु मला प्राप्त झालीस. हे व्रत भाद्रपद महिन्यातील पहिल्या तृतीयेला करावं. ते पूर्वी तु कसं केलंस ते मी तुला आता सांगतो.
तु लहानपणी मी तुला प्राप्त व्हावं म्हणून मोठं तप केलंस. चौसष्ठ वर्ष तर झाडाची पिकली पानं खाऊन होतीस. थंडी, पाऊस, ऊन हे तिन्ही दुःख सहन केलंस. हे तुझे श्रम पाहून तुझ्या वडिलांना फार दुःख झालं व अशी कन्या कोणाला द्यावी? अशी चिंता त्यांना पडली.
इतक्यात तिथे नारदमुनी आले. हिमालयाने त्यांची पूजा केली व येण्याचं कारण विचारलं. तेव्हा नारदमुनी म्हणाले, तुझी कन्या उपवर झाली आहे ती विष्णूला द्यावी, तो तूचा योग्य नवरा आहे. त्यांनीच मला तुझ्याकडे मागणी करण्यास पाठवलं आहे म्हणून, मी इथं आलो आहे. हिमालयाला मोठा आनंद झाला. त्यानं ही गोष्ट कबूल केली नंतर नारद तेथून विष्णुकडे आले. त्यांना ही हकीकत कळवली व आपण निघून दुसरीकडे गेले.
नारद गेल्यावर तुझ्या वडिलांनी ही गोष्ट तुला सांगितली, ती गोष्ट तुला रुचली नाही. तु रागावलीस असं पाहून तुझ्या सखीनं रागावण्याचं कारण विचारलं, तेव्हा तु सांगितलंस, महादेवावाचून मला दुसरा पती करणे नाही, असा माझा निश्चय आहे, असं असून तुझ्या वडिलांनी तुला विष्णूला देण्याचं कबूल केलं आहे, ह्याला काय उपाय करावा?
मग तुला तुझ्या सखीनं एका घोर अरण्यात नेलं. तिथं गेल्यावर तुला एक नदी दृष्टीस पडली. जवळच एक गुहा आढळली. त्या गुहेत जाऊन तु उपास केलास. तिथं माझं शिवलिंग पार्वतीसह स्थापलंस, त्याची पूजा केलीस. तो दिवस भाद्रपद शुद्ध तृतीयेचा होता. रात्री जागरण केलंस. त्या पुण्यांन इथलं माझं आसन हाललं. नंतर मी तिथे आहे, तुला दर्शन दिलं. आणी वर मागण्यास सांगितलं, तु म्हणाली, तुम्ही माझे पती व्हावे, याशिवाय दुसरी इच्छा नाही!
नंतर ती गोष्ट मी मान्य केली. मी गुप्त झालो. पुढे दुसऱ्या दिवशी तु व्रतपूजा विसर्जन केलंस. मैत्रिणीसह त्याचं पारनं केलंस. इतक्यात तुझे वडील तिथे आले. मग तु सर्व हकीकत सांगितलीस. पुढे त्यांनी तुला मलाच देण्याचं वचन दिलं. तुला घरी घेऊन गेले मग काही दिवसांनी चांगला मुहूर्त पाहून मला अर्पण केलं. अशी या व्रतानं तुझी इच्छा पूर्ण झाली. याला 'हरितालिका व्रत' असं म्हणतात.
Comments
Post a Comment