कीर्तन: प्रबोधन की मनोरंजन?

    नमस्कार मित्रांनो मी आर्या भोसुरे. आज आपण कीर्तन प्रबोधन की मनोरंजन हे अभ्यासणार आहोत. सर्वप्रथम कीर्तन म्हणजे काय हे जाणून घेणे मला महत्वाचे वाटते म्हणून, आज हा विषय आपण तीन टप्प्यांमध्ये बघणार आहोत. प्रथम कीर्तनाची व्याख्या, द्वितीय कीर्तनाची माहिती, आणी शेवट कीर्तन: प्रबोधन की मनोरंजनासाठी असते?
    मित्रांनो कीर्तन मधील किर म्हणजे काढणे, उपटून टाकणे आणी तण म्हणजे गवत. आपल्याला गवत काढायचेच आहे परंतु ते शेतातले नाही बरं का तर श्रोत्यांच्या मनाभोवती असलेले अज्ञानरूपी, अंधःकाररूपी निर्माण झालेले तण उपटून टाकणे म्हणजेच कीर्तन होय, आणी हे कार्य करणाऱ्या व्यक्तीला कीर्तनकार असे म्हणतात. 
    ही झाली कीर्तनाची व्याख्या आता आपण कीर्तनाची माहिती बघणार आहोत. देवश्री नारदांना भारतातील आद्य कीर्तनकार म्हटले जाते.देवश्री नारदांनी कीर्तन हे महर्षी व्यासांना शिकवले पुढे जाऊन व्यास महर्षीनीं ते शुकास शिकवले व पुढे त्याचा सर्वत्र प्रसार झाला अशी कीर्तन परंपरा सांगितली जाते. भारतातल्या सर्व प्रदेशांत, सर्व भाषांत आणी सर्व संप्रदायात कीर्तन हा प्रकार आढळतो.श्रीमद्भागवतात सांगितल्याप्रमाणे नवविधा भक्तींपैकी ही दुसरी भक्ती आहे. महाराष्ट्रात कीर्तनाची परांपरा फार पूर्वापार चालत आलेली आहे.
    सर्व लोकांना ईश्वरभक्तिमध्ये रममाण करणे हा कीर्तनाचा मुख्य उद्देश आहे. कीर्तनात तबला, पेटी, टाळ, चिपळ्या, मृदूंग, झांज इ., वाद्ये वापरली जातात. सुरुवातीला नारदीय कीर्तन व वैयासिक कीर्तन म्हणजे महर्षी  व्यासांनी सुरु केलेले कीर्तन असे दोन कीर्तन प्रकार होते मात्र, नंतरच्या काळात नारदीय कीर्तनातून रामदासी कीर्तन, वारकरी कीर्तन, संयुक्त कीर्तन, राष्ट्रीय कीर्तन असे अनेक प्रकारचे कीर्तनप्रकार उदयास आले.
   रामदासी कीर्तन परंपरा ही समर्थ रामदास स्वामींनी सुरु केली. हे कीर्तन मुख्यत समर्थांच्या रचनांवर आधारित असते तर, वारकरी कीर्तन संत नामदेव हे या परंपरेचे आद्य कीर्तनकार आहेत. वारकरी कीर्तनात ज्ञानोबा ते निळोबा यांचे वाङमय येते. संतांच्या अभंगांचे गायन आणी त्यावर निरूपण अश्या पद्धतीचे २०-२५ साथीदारांसोबत वारकरी कीर्तन सादर केले जाते.
    भारतातील कीर्तनात थोडाफार बदल झाला असला तरी त्याचा मूळ गाभा कायम राखून आहे. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत एकनाथ, रामदास स्वामी व संत नामदेव कीर्तन करीत असत. संत नामदेवांच्या मधुर वाणीने साक्षात विठूराय देखील त्यांच्या कीर्तनात नृत्य करीत असत म्हणूनच,
नामदेव कीर्तन करी, पुढे देव नाचे पांडुरंग -(२)
   व आजही अनेक कीर्तनकार समाज- प्रबोधनाचे कार्य करीत आहे जसे, बाबा महाराज सातारकर, चैतन्य महाराज वाडेकर, पुरुषोत्तम महाराज पाटील, सागर महाराज बोराटे, जयश्रीताई तिकांडे, मक्ताई महाराज चाळक व आपल्या महाराष्ट्रातील आवडते व्यक्तिमत्व निवृत्ती महाराज देशमुख म्हणजे इंदुरीकर महाराज यांचा उल्लेख मला आवर्जून इथे करावासा वाटतो.
    सद्यस्थितीला अनेक कीर्तनकार असूनही मी इंदुरीकर बाबांविषयी बोलत आहे कारण एकेकाळी तमाशाच्या नादाने वेडी झालेली लोक कीर्तनाकडे वळाली ति याच माणसामुळे. तरुणांमध्ये  कीर्तनाची आवड निर्माण केली ति याच माणसाने. गावरान रांगडी भाषेत तरुण मुलामुलींना कठोर शब्दांत अक्कल शिकवली ति याच माणसाने.
    मित्रांनो महाराजांची भाषा जरी रांगडी असली तरी ग्रामीण भागात ति सर्रास बोलली जाते. महाराज कीर्तनात मनोरंजन करत असले तरी त्यातून ते एकप्रकारे प्रबोधनच करत असतात त्यामुळे जे कीर्तनकार कीर्तनात मनोरंजन करतात त्यांना त्यातून प्रबोधन देखील करता यायला हवे तसेच माणसाच्या १० चांगल्या गुणांच कौतुक कोण कधी करत नाही, पण त्याच्याकडून झालेली एखादी नकळत चुक आपण लगेच उचलून धरतो त्यामुळे हे कुठेतरी थांबायला हवे.
    आणी शेवट कीर्तन हे प्रबोधनासाठी असते की मनोरंजनासाठी? याचे उत्तर आपण सर्व जण जाणतो. अर्थातच कीर्तन हे केवळ प्रबोधनासाठी असते. कीर्तनाचा मुख्य उद्देश समाजप्रबोधन असल्याने तो मागे राहता कामा नये.कीर्तन हे पूर्वी प्रचार, प्रसार आणी समाजप्रबोधनाचे एक उत्तम माध्यम होते परंतु आता फारशी तशी परिस्थिती राहिली नाही. कीर्तनाचा कल प्रबोधनाकडून मनोरंजनाकडे न होता, मनोरंजनाकडून प्रबोधनाकडे असले पाहिजे.
    भगवंताचे आणी थोर विभूतींचे गुणगायन करणारा कीर्तन हा प्राचीन कलाप्रकार आहे. मुळात कीर्तन म्हणजे, देवाची स्तुती होय जी कर्कश आवाजात केली जात नाही तर योग्य अशा लयमध्ये केली जाते पण, सध्याचे काही कीर्तनकार कर्कश आवाजात तेही मूळ विषय सोडून इतरच विषयावर बोलताना आढळतात. आजही बरेच कीर्तनकार कीर्तन करताना केवळ प्रसिद्धीसाठी अतिशयोक्ती हावभाव व मनोरंजन हा हेतूने कीर्तन करताना दिसतात अश्या कीर्तनकारांना माझी एकच विनंती आहे, 'किर्तन' हा संतांनी आपल्या महाराष्ट्र भूमीला दिलेला उपहार आहे आणी तो आपणच जपायला हवा. आपल्या संस्कृतीचे जतन करणे आपले आद्यकर्तव्य आहे, तसेच कीर्तनकारांना मानसन्मान देणे हे देखील आपले कर्तव्य आहे. 

          Thanks for visiting the blog

Comments

Popular posts from this blog

केशरी गुरुवार व्रत मराठी

माझा छंद निबंध मराठी

विजयादशमी/दसरा महत्व मराठी